वंदनीय अहिल्याबाई होळकर
अहिल्याबाईंचं नाव माहीत नाही अशी व्यक्ती महाराष्ट्रातच नव्हे तर उभ्या हिंदुस्तानात सापडणं दुर्मिळ आहे. पेशव्यांचे अत्यंत शूर, हुशार आणि दिलदार सरदार मल्हारराव होळकर यांच्या या सुनबाई. पण अहिल्याबाईंची ओळख इतकीच मर्यादित नाही. त्यांची स्वतःची एक वेगळी ओळख आहे जी त्यांनी त्यांच्या दीर्घकालीन दैदिप्यमान कर्तृत्वातून निर्माण केली आहे. आपल्या शालेय इतिहासात ती आपल्याला कधीच शिकवली जात नाही.
इंदोरचे मल्हारराव होळकर हे अतुल्य पराक्रमी आणि उत्कृष्ट शासक होते. त्यांची न्यायपद्धती, कराची रचना, रयतेवरचं प्रेम, धर्मनिष्ठा सगळं काही अगदी वाखाणण्याजोगं होतं. पण या पहाडासारख्या पुरुषाला सलणारं आणि छळणारं एक दुःख होतं – ते म्हणजे त्यांचा लेक खंडेराव. खंडेराव म्हणजे हिऱ्याच्या खाणीत जन्मलेला कोळसाच जणू. त्याला हरतऱ्हेची व्यसनं होती. चंगीभंगी राहण्यासाठीच जणू त्याचा जन्म झाला होता. राज्यकारभारात त्याचं मुळीच लक्ष्य नव्हतं. खंडेरावाच्या या वर्तणुकीनं त्याची पत्नी अहिल्या सुद्धा कष्टी झाली होती.
पण अहिल्या मोठी गुणाची बाई. मल्हाररावांसारख्या मुरब्बी सरदाराला आपल्या सुनेचे बावनकशी गुण दिसले नाहीत तरच नवल. अहिल्याबाईंच्या गुणांमुळे त्या मल्हाररावांच्या लाडक्या तर होत्याच, शिवाय त्यांच्या आशेचं एकमेव स्थान होत्या.
सासरा आणि सून दोघंही हुशार, महत्वाकांक्षी आणि जिद्दीचे. मल्हाररावांना अहिल्याबाईंचे गुण लक्षात येऊ लागताच त्यांनी अहिल्याबाईंना राज्यकारभारात सामील करून घ्यायला सुरुवात केली. न्यायनिवाडा कसा करायचा, सैन्याची मोजणी करताना हत्ती आणि घोडेही कसे मोजायचे, मधमाश्या फुलाला इजा न करता मध गोळा करतात त्याप्रमाणे प्रजेला नाराज न करता कर कसा गोळा करायचा, हाताखालच्या लोकांकडून कामं कशी करून घ्यायची, हिशोब कसा चोख ठेवायचा या सर्व गोष्टी अहिल्याबाई मल्हाररावांच्या तालमीत शिकल्या. अहिल्याबाईंच्या सासूबाई गौतमीबाई या सुद्धा चतुर होत्या. त्यांचीही मदत या दोघांना मिळाली. हळूहळू मल्हारराव दौऱ्यावर जाताना महत्वाच्या जबाबदाऱ्या अहिल्याबाईंवर सोपवून जाऊ लागले.
अहिल्याबाईंच्या पतीचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांचं वय अवघं २९ वर्षांचं होतं. मल्हाररावांच्या आग्रहामुळं त्या सती (मुगल काळात शीलाच्या भयानं स्त्रिया सती जात. त्यापूर्वी जात नसत.) गेल्या नाहीत. मात्र त्यांचं पुढील आयुष्य त्यांनी अत्यंत व्रतस्थपणे काढलं. त्या पांढरं शुभ्र नऊवारी लुगडं नेसत. दागिना म्हणून गळ्यात केवळ एक सर असे. एका घोंगडीवर त्या झोपत आणि केवळ शाकाहार घेत. अहिल्याबाई खूप धार्मिक होत्या. वेगवेगळ्या प्रकारच्या सत्तर पोथ्यांचा संग्रह त्यांच्याकडे होता. राज्यकाराभारातून वेळ मिळेल तेव्हा त्यांच्या जप-जाप्य, व्रत-वैकल्य, दानधर्म, पोथीवाचन यात त्या खंड पडू देत नसत.
मल्हाररावांच्या निधनानंतर राज्यकारभाराची सगळी जबाबदारी अहिल्याबाईंवर येऊन पडली. ज्या काळात हिंदुस्तानाबाहेरच्या जगात स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला नव्हता, स्त्री म्हणून सन्मान नव्हता, पुरुषांपेक्षा जास्त तास काम करूनही कमी पगार मिळत होता, महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता... त्या काळात हिंदुस्तानात अहिल्याबाई राज्य करून इतिहास घडवत होत्या. आपल्या राष्ट्रातील नारीशक्तीचं आणि स्त्री सन्मानाचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे वंदनीय अहिल्याबाई!
सर्वप्रथम त्यांनी करवसुलीचं काम स्वतःकडे घेतलं. त्याकाळी एकाच व्यक्तीकडे अनेक गावांच्या करवसुलीचा अधिकार असे. त्यामुळं अधिकारी मनमानी करत. त्यांना पैश्याचा लोभ निर्माण होई. मग ते रयतेवर अन्याय करत आणि धनाढ्य होत. अहिल्याबाईंनी ही प्रथा बंद केली. त्यांनी थेट रयतेकडून कर घ्यायला सुरुवात केली. त्यांनी रयतेला आव्हान केलं, “आपल्या कमाईचा एक चतुर्थांश हिस्सा करस्वरुपात देणं हे मल्हारी मार्तंडाचं काम आहे. भगवंताचं देणं आहे.” अशी दानाची पवित्र भावना लोकांच्या मनात निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या. करातून आलेल्या या धनाचा सदुपयोग करण्यात तर अहिल्याबाईंचा हात कोण धरणार? रामेश्वर, मल्लिकार्जुन, बालाजी गिरी, गोकर्ण महाबळेश्वर, पशुपतेश्वर, द्वारका, जगन्नाथपुरी, परळी वैजनाथ, त्र्यंबकेश्वर, जेजुरी, बद्रिकेदार, ओंकारेश्वर, काशी विश्वेश्वर, उज्जैन, पंढरपूर, भीमाशंकर, रामपंचवटी अश्या कैक धार्मिक क्षेत्रांना त्या गंगाजळी म्हणजे आर्थिक निधी पाठवत. अनेक धार्मिक क्षेत्रांवर त्यांनी नदीवर घाट बांधले, मंदिरं बांधली, धर्मशाळा बांधल्या. कित्येक ठिकाणी पाणपोया सुरु केल्या. कित्येक क्षेत्रांत त्या अन्नछत्र चालवत जिथे गरजू लोक जेवून जात. गावागावात त्यांनी सरकारी खर्चानं विहिरी बांधल्या.
अहिल्याबाईंनी शेतकऱ्यांना बी-बियाणं आणि अवजारं पुरवली. शेतीला उत्तेजन दिलं. शेती उत्पन्नावर आधारित कर आकारणी केली. त्यामुळं शेतकरी खुश झाले. ‘मेहनत माणसाची आणि दौलत भगवंताची’ ही भावना त्यांनी लोकांमध्ये रुजवली. त्यातून व्यापार उदीम वाढला. अश्या प्रकारे गरिबांच्या अन्न आणि पाणी या गरजा पूर्ण करण्याची सोय त्या धार्मिक मार्गातून करत होत्या. त्यासाठी त्यांनी आपल्या राज्याबाहेरील क्षेत्रांना सुद्धा मदत केली.
योग्य न्यायदान देण्याबाबात अहिल्याबाईंचा विशेष नावलौकिक होता. अयोध्या, उदयपूर, कोटा, ग्वाल्हेर, जयपूर या परिसरात त्यांच्या न्यायदानाची ख्याती होती. त्याकाळी पतीनिधनानंतर स्त्रिया नातलगांच्या आधारे जगत. निपुत्रिक आणि वैभवसंपन्न स्त्रिया पुत्र दत्तक घेत, पण त्यासाठी त्यांना सरकारदरबारी काही रक्कम भरावी लागे. एकदा सिरोज परगण्यातील खेमदार सावकाराच्या विधवा स्त्रीला दत्तक घेण्याची इच्छा झाली. तिला दत्तक मंजूर करताना तिथल्या कमाविसदारानं भरपूर माया जमवली. अहिल्याबाईंना हे कळताच त्यांनी त्या कमाविसदाराला बडतर्फ केलं, त्याला दंडही केला. सावकार स्त्रीला त्यांनी सर्व संपत्ती लोकोपयोगी कामात उपयोगात आणण्याचा सल्ला दिला.
रयतेला त्रास देणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळ्या, राज्यावर हल्ले करणारे आजूबाजूचे राजे, अंतर्गत बंडाळी करणारे असंतुष्ट घातकी लोक या सर्वांना अहिल्याबाईंनी पाणी पाजलं होतं. पेशवाईत त्यावेळी साडेतीन शहाणे होते. त्यापैकी महादजी शिंदे आणि नाना फडणवीस या दोघांना अहिल्याबाईंनी गप्प केलं होतं.
अहिल्याबाईंना माणसांची पारख होती आणि बऱ्याच लोकांचा विश्वास संपादन करण्यात त्यांना यश मिळालं होतं. त्यांनी नेमलेले प्रशासकीय अधिकारी हुशार, प्रामाणिक आणि कर्तबगार होते. ते अहिल्याबाईंशी एकनिष्ठ होते. १७८० साली अहिल्याबाईं आणि त्यांचा विश्वासू सरदार तुकोजी होळकर यांचं थोडं बिनसलं. त्यानंतर तुकोजीचा कारभारी नारो गणेश यानं अहिल्याबाईंच्या विरुद्ध सैनिकी उठाव करण्याचा प्रयत्न केला. पण एकही सैनिक त्याला साथ द्यायला तयार झाला नाही. सैनिकांना अहिल्याबाईंच्या प्रति ही अशी आत्यंतिक आत्मीयता आणि निष्ठा होती.
अहिल्याबाईंच्या मुलाच्या मृत्युनंतर त्यांना दत्तक वारस घेण्याची वेळ आली. या परिस्थितीचा फायदा घेण्याचा विचार करून राघोबादादांनी अहिल्याबाईंच्या सल्लागाराला वश करून घेतलं आणि त्यांच्याकडे मोठ्या खंडणीची मागणी केली. खंडणी दिली नाही तर हल्ला करण्याची धमकी दिली. पण अहिल्याबाई मोठ्या झुंजार वृत्तीच्या. त्यांनी महिलांची पलटण तयार केली. (हिंदुस्तानातील ही महिलांची पहिली पलटण असावी.) शिंदे, नागपूरकर भोसले, गायकवाड या सरदारांना त्यांनी आपल्या बाजूला वळवलं. आपल्या अत्यंत विश्वासू वकिलामार्फत झाला प्रकार माधवराव पेशव्यांच्या कानावर घातला. माधवरावांनी राघोबांना परत फिरण्याचे आदेश दिले. मोठ्या शत्रूला सुद्धा या वाघिणीनं अश्या रीतीनं नमवलं.
संतवृत्तीच्या, प्रजाहितदक्ष, मुत्सद्दी, दानशूर, धार्मिक, प्रजेसाठी मातृहृदयी, गुन्हेगारांसाठी कठोर, राजकारणात कुशल, शूर, लढवय्यी, दूरदर्शी असलेल्या अहिल्याबाईंनी इंग्रजांचा धोका खूप लवकर ओळखला होता.
वयाच्या सत्तर वर्षांपर्यंत म्हणजे सुमारे एक्केचाळीस वर्षे त्यांनी राज्यकारभार केला. त्यांच्या आजारपणात सुद्धा त्यांनी प्रजेकडे दुर्लक्ष केलं नाही.
अत्यंत क्लेशदायक अश्या वैयक्तिक आयुष्यात व्रतस्थ राहून, दानधर्म करून केवळ प्रजेच्या हिताचा विचार करणारी ही राणी प्रात:स्मरणीय आणि वंदनीय आहे.
आपला हा (आणि असा) प्रेरक आणि अभिमानास्पद आम्हाला शालेय जीवनात का शिकवला जात नाही हा खरा प्रश्न आहे.
-------
वैद्य सुचित्रा कुलकर्णी यांच्या फेसबुक वरून