Sunday, 29 January 2017

ग्रामसभा

जशी लोकसभा, विधानसभा तशी ग्रामसभा. लोकसभेचे सभासद खासदार असतात. विधानसभेचे सभासद आमदार असतात. तसेच ग्रामसभेचे सभासद मतदार असतात.

माणूस १८ वर्षाचा झाला कि त्याला मतदान करण्याचा अधिकार मिळतो. मग तो प्रत्येक नागरिक आपोआपच ग्रामसभेचा सदस्य बनतो. एकदा सदस्य झाला कि तो मरेपर्यंत सदस्य असतो. ग्रामसभेला निवडणूक नाही. गावातील प्रत्येक मतदार नागरिक हा ग्रामसभेचा सदस्य आहे.

ग्रामसभेत हजर राहण्याचा, ग्रामसभेत मत, विचार मांडण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. बहुमतांनी ठराव पास / नापास करण्याचा, मत देण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे.

जसे हे अधिकार आहेत तसेच हे अधिकार बजावण्याचे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. गावातील ग्रामपंचायत आपण सांगतो तशी चालविणे, चालते कि नाही हे पाहणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.

ग्रामसभेत जे ठरेल, जे ठराव होतील त्याची अंमलबजावणी करणे ग्रामपंचायतीवर बंधनकारक आहे. जर ग्रामसभेला गेलो नाही, आपण सांगतो त्याप्रमाणे ठराव करून घेतले नाहीत, तर ग्रामपचायतीमध्ये ग्रामसेवक, सरपंच उपसरपंच व सदस्यांचा मनमानी कारभार चालेल.

अनेक गावात प्रत्यक्षात ग्रामसभा होत नाहीत. ग्रामसभेच्या ८ दिवस आधी लोकांच्या सह्या घेतल्या जातात, किंवा खोट्या सह्या / अगन्ठे  घेतात. व सरपंच / ग्रामसेवक मनानेच खोटे ठराव घेवून पंचायत समितीत पाठवून देतात. यामुळे प्रत्यक्षात गावात फार मोठा भ्रष्टाचार होवूनही लोकांना माहिती असू शकत नाही.

वर्षातून किमान ६ ग्रामसभा घेणे ग्रामपंचायतीवर बंधनकारक आहे. ६ पेक्षा जास्त घेतल्या तर हरकत नाही. पैकी ४ ग्रामसभांच्या तारखाही फिक्स आहेत.

२६ जानेवारी            - प्रजासत्ताक दिन
१   मे                       - कामगार दिन
१५ ऑगस्ट              - स्वातंत्र्य दिन
२   ऑक्टोबर           - गांधी जयंती

या दिवशी ग्रामसभा भरविणे बंधनकारक आहे. ग्रामसभेची नोटीस हि सभेच्या तारखेपूर्वी १० दिवस आधी बजावावी लागते. नोटीस हि ग्रामपंचायत कार्यालयात तसेच सर्वाना पाहता येईल, व सहजपणे वाचता येईल अशा ठिकाणी लावून प्रसिद्ध करावी लागते. तसेच सभेच्या ८ दिवस अगोदर व सभेच्या एक दिवस अगोदर अश दोन वेळा प्रत्येक वार्डात, वाडीत सविस्तर दवंडी हि द्यावी लागते.

सभेचा अध्यक्ष

आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष तसेच निवडणुकीनंतरचा पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच असतो. सरपंचांच्या गैरहजेरीत उपसरपंच हा अध्यक्ष असतो बाकी उर्वरित ग्रामसभेचा अध्यक्ष मतदारांनी बहुमताने निवडून दिलेला व्यक्ती हा ग्रामसभेचा अध्यक्ष असतो.

ग्रामसभेत कसे बोलावे ?

ग्रामसभेत मतदारांना बोलण्याचा अधिकार आहे. मतदारांनी ग्रामसभेच्या अध्यक्षाची परवानगी घेवून बोलावे तसेच उभे राहून अध्यक्षांना अध्यक्ष महाराज असे संबोधून त्यांचेकडे पाहून बोलावे. अध्यक्षांनी सुद्धा माहिती विचारणाऱ्याकडे पाहून बोलावे.

सभेत मतदारांच्या प्रश्नाला फक्त अध्यक्षच उत्तर देवू शकतात. इतरांना उत्तरे देण्याचा अधिकार नाही.

सभेचे कामकाज

ग्रामसेवक हा ग्रामसभेचा सचिव असतो. ग्रामसभेचे इतिवृत्त सचिव तयार करून व्यवस्थित ठेवतो. मात्र त्याच्या अनुपस्थित अध्यक्ष सांगेल तो शिक्षक, तलाठी, अंगणवाडी सेविका या सारख्या शासकीय/ निमशासकीय / ग्रामपंचायत कर्मचारी तयार करील.

अत्यंत महत्वाचे

पुढील ग्रामसभेत ज्या विषयांचे ठराव व्हावेत असे आपणास वाटते, त्याचे निवेदन तयार करून तसा विनंती अर्ज सभेच्या ८ दिवस आधी ग्रामपंचायतीत जमा करून त्याची पोच घ्यावी.

ग्रामसभेत ठराव मांडावा, त्यावर बहुमत घेण्यास भाग पाडावे. ठराव पास . नापास झालेला प्रोसिडिंग बुक मध्ये लिहिला कि नाही. ठराव जसा झाला तसाच लिहिला कि बदल करून लिहिला हे शिकलेल्या मुलाकडून मोठ्याने वाचून घ्यावे. अन्यथा ठराव होवूनही प्रोसिडिंग बुकात न लिहिणे किंवा चुकीचा लिहिणे हे प्रकार सर्रास घडतात.

ग्रामसभेत आपण रस्ता, पाणी, गटार, वीज, शिक्षण, आरोग्य, शौचालये, रेशन, रोजगार, घरकुले, असे कोणतेही नागरी, सार्वजनिक हिताचे प्रश्न उपस्थित करू शकतो व त्यावर चर्चा घडवून आणू शकतो व ठराव करण्यास भाग पडू शकतो.

आपण जर नियमितपणे ग्रामसभेत उपस्थित राहिलो व ग्रामसभेत सहभाग दिला व ग्रामपंचायतीच्या कारभारात हस्तक्षेप केला तर आपणास गावातील कोणत्याही अडचणीसाठी तालुका, जिल्ह्याच्या गावी जाण्याची गरज नाही.

आर्थिक वर्षातील पहिली ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात घेणे बंधनकारक आहे. तसेच उर्वरित ग्रामसभा इंग्रजी मुळाक्षरांच्या (अल्फाबेटिकल्स प्रमाणे) अद्याक्षरांप्रमाणे इतर वाडे, वस्तीवर घ्याव्यात.

आपण जर निवेदन दिले कि, अमुक तारखेला अमुक वाजता, अमुक या ठिकाणी ग्रामसभा घ्यावी, तर त्या प्रमाणे ग्रामसभा घ्यावी लागते.

आपण जर ग्रामसभेला गेलो तर आपला रोज बुडेल असे वाटत असेल तर आदल्या ग्रामसभेला पुढील ग्रामसभेची वेळ ठरवून घ्यावी. किंवा निवेदन देवून सांगावे.

संध्याकाळी किंवा सकाळी लवकर देखील मतदारांच्या सोयीच्या वेळेत ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे.

जर ग्रामसभेच्या दिवशी लग्न / मयत किंवा महत्वाचे कार्यक्रम असतील तर निवेदन देवून नागरिकांच्या सोयीच्या दिवशी ग्रामसभा भरविण्यास सुचवता येवू शकते.

प्रत्येक  ग्रामसभेपुर्वी एक दिवस अगोदर महिलांची ग्रामसभा घेणे आवश्यक आहे. त्या सभेमध्ये पारित झालेले ठराव जसेच्या तसे ग्रामसभेने मान्य करावे लागतात.

जर आपल्या ठरावाची नोंद इतीव्रूत्तात नसेल तर आपन ग्रामसभेचे विडिओ रिकोर्डिंग मागवुन तपासु शकतो.

सशक्त नागरीक सशक्त गाव .

👆👆लोकशाही मध्ये
वाघासारखे जगा..

अतिशय महत्वाची माहिती आहे प्रत्येकाला कळालीच पाहिजे.

Saturday, 21 January 2017

हजार तासांची घरातली शाळा.....

पालकांसाठी लेख (हेरंब कुलकर्णी )
  टिव्ही आणि सोशल मिडिया यांचा लहान मुलांवर होणारा परिणाम व पालकांची जबाबदारी यावर आज सकाळ च्या सप्तरंग पुरवणीत लेख प्रसिद्ध झाला आहे....................... 
                   हजार तासांची घरातली शाळा.....                                                                                 ___________________________
                   शिक्षण कायदयाने प्राथमिक शाळा वर्षाला ८०० तास तर माध्यमिक शाळा  १००० तास चालते. इतका कमी काळ चालणार्या  शाळेचे आपण समाज शासन पालक म्हणून किती बारकाईने मूल्यमापन करतो. त्यांच्याकडून खूप सार्या  अपेक्षा करतो.ते करायला ही हरकत नाही.पण दुसरी एक १००० तास घरातच शाळा भरते पण त्या शाळेकडे पालक लक्ष देत नाही की त्या शाळेशी दर्जा सुधारा म्हणून भांडत नाहीत. त्या शाळेकडून अपेक्षा करीत नाहीत. कोणती आहे ती शाळा ?ती शाळा आहे दूरदर्शन आणि सोशल मिडियाची....!!!!
                     १००० तास ? होय.आपली मुले वर्षाला टीव्ही आणि सोशल मीडिया एका वर्षात १००० तासापेक्षा जास्त वेळ बघतात म्हणजे शाळेच्या वेळेतच या शाळेत ते असतात आणि तरीही त्या शाळेत ती काय शिकतात याकडे पालक,समाज ,शासन औपचारिक शाळेकडे  काळजीने बघत नाहीत.
                         याउलट टिव्हीविरोधी बोलणार्यााना फॅडिस्ट समजले जाते.माझ्या घरातला टिव्ही गेली ३ वर्षे मी बंद ठेवला आहे. त्याचा लाभ मुलाचे वाचन,चित्र काढणे वाढले.गंभीरपणे एखादा विषय समजून घेणे वाढले. माझे स्वत:चे लेखन टिव्ही नसल्याने वाढले.मुलगा ज्या विषयात आवड आहे ती माहिती नेटवर बसतो. बातम्या दुसर्या  दिवशी वर्तमानपत्रातून समजल्याने काही फरक पडत नाही. हे सारे सकारात्मक परिमाण मी अनुभवतो आहे॰ पण जेव्हा आमच्याकडे कुणी येते आणि घरात टिव्ही नाही तेव्हा एखाद्या हातपाय नसलेल्या व्यक्तीकडे दयेने बघावे तसे ते बघतात व जगाच्या ज्ञांनापासून मुलांना दूर ठेवू नका असा उपदेश करतात.  
                           तेव्हा या टिव्ही आणि सोशल मिडियच्या अनौपचारिक शाळा खरच जगाचे परिपूर्ण ज्ञान देते का ?मुलांना शाळा जशा विकासाच्या संधी देते तशा संधी देते का ?या गृहीतकाचीच उलटतपासणी करायला हवी. 
टिव्ही ने आणि सोशल मीडिया ने शारीरिक नुकसान मुलांचे होते त्यापेक्षा कितीतरी जे अधिक नुकसान हे मानसिक स्तरावरचे असते. वेगवान हालचाली हिंसकतेशी जोडल्या गेल्याने मुलांना मग हिंसकताही आवडू लागते. कार्टून सिरियल्स बघितल्यामुळे लहान मुलांमध्ये हिंसकता वाढते. टॉम व जेरीचे विनोद हे आवडतात. त्यांच्यातली हिंसक प्रवृत्ती व त्यांच्या हिंसक कारवायांभोवती गुंफलेले असतात. हॉरर चित्रपट  किंवा मालिकासुद्धा आवडायला लागतात. भीती  आणि हिंसा याबाबत त्यांची संवेदनशीलता कमी होत जाते आणि याचा त्यांच्या प्रत्यक्ष जीवनावरही परिणाम होतोच. माध्यमिक शाळेतली मुलांना एकटय़ाने किंवा समवयीन मुलांबरोबर टीव्ही बघायला आवडतं. स्वातंत्र्य, प्रणय हे विषय आवडतात . म्युझिक व्हिडीओज्, हॉरर मूव्हीज् आणि पोर्नोग्राफिक व्हिडीओज् बघायला आवडतात. मध्यंतरी मानसोपचार परिषदेत किशोर अवस्थेतील ५० टक्के मुले पोर्न बघतात असा निष्कर्ष अतिरेकी वाटला तरी मोबाइलच्या वापरामुळे  वास्तवाच्या जवळ जाणारा आहे.
                        आपली मुले टिव्ही आणि सोशल मिडियाच्या शाळेत शिकतात. यातून त्यांच्या भावनांकाची तोडफोड होते.हिंसाचार बघून संवेदना बोथट होतात.अपघात बघून थंडपणे पुढे जाणारी पिढी घडते.ओरडणे,शिवीगाळ,प्रसंगी मारहाण हे स्वभाव विशेष होतात. मध्यंतरी संगमनेर तालुक्यात लहान वर्गमित्रांनी आपल्याच मित्राचा केलेला खून हे बोलके उदाहरण ठरावे. प्रेमप्रकरणे अगदी ५ वीच्या वर्गापासून सुरू होतात. गेल्या ३ वर्षात मुंबईत १५ वर्षाखालील मुलींच्या गर्भपात करण्याच्या प्रयत्नात १४४ टक्क्याने वाढ झाली आहे तर १५ ते १९ वयोगटात गर्भपातात ४७ टक्के वाढ झाली आहे. या तपशीलाचा सहसंबंध या माध्यमांशी जोडायचा की नाही ?
                     ग्रामीण आणि आदिवासी भाग हाही याला अपवाद नाही. किंबहुना गरीब कुटुंबात ही एकमेव करमणूक व एकच खोली त्यामुळे तिथे मुले जास्त टिव्ही बघतात. मोबाइल बघतात.या आभासी जगातली मूल्यव्यवस्था आणि जाहिरातीतील जग त्यातील घर,तिथली सुंदर नटलेली आई ,गाडी आपल्या वाट्याला का नाही ? यातून एक वेगळाच न्यूनगंड मुलांमध्ये  
                   संशोधनात असे आढळून आले की, जास्त टीव्ही पाहणार्याल मुलांमध्ये खेळाची आवड कमी होत जाते. ते लांबउडीदेखील मारू शकत नाहीत. माँट्रियल विद्यापीठ व जस्टिन मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल यांच्या संयुक्त  संशोधनातून मुलांनी अनेक तास टीव्ही पाहिल्याने त्यांच्यात स्थूलपणाच्या तक्रारी वाढतात. त्याच्या शरीरातील मांसपेशी कमजोर पडतात व त्यामुळे भविष्यात त्याच्या प्रकृतीला गंभीर धोका पोहोचू शकतो.
तासन्तास दूरचित्रवाणी बघितल्यास प्राणघातक पल्मनरी एम्बॉलिझम हा रोग होण्याची शक्यता असते.पल्मनरी एम्बॉलिझम म्हणजे हृदयाकडून फुफ्फुसाकडे रक्त वाहून नेणार्याम रोहिणी या मुख्य रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण होते 
            यावर उपाय काय? आमच्यासारखे टिव्ही बंद करावा आणि ते शक्य नसेल तर मुलांशीच चर्चा करून रोज १ तास टिव्ही बघण्याचे वेळापत्रक ठरवावे. कार्यक्रम एकत्र बघावेत.बघितल्यावर मुलांशी त्यावर चर्चा करावी. जाहिरातींचा पडणारा प्रभाव,खोटी जीवनमूल्ये यावर चर्चा करून वास्तवाची जाणीव करून द्यावी. त्याचबरोबर आपण सोशल मिडिया कमीत कमी वापरुन मुलांच्या हातात मोबाइल देवू नये. उलट सुटीच्या दिवशी जास्त वेळ व रोज मुलांशी बोलणे,खेळणे .त्याला चित्र काढणे,गोष्टीची पुस्तके वाचणे हे करायला हवे.पालकांची मुले अनुकरण करतात. तुमच्या हातात पुस्तके आली,घरात लहान मुलांसाठी ची पुस्तके असली तरच मुले ती वाचतील. तेव्हा पालक टिव्हीसमोर आणि whatsapp वर असतील तर मुले तेच करणार..तेव्हा टिव्ही सोशल मिडियाला सशक्त पर्याय पालकांनी दिले तरच घरातली १००० तासांची शाळा मुलांची सुटेल.
                  राजीव दीक्षित म्हणायचे की   राजा हरिश्चंद्र हे नाटक बघून जर मोहनदास नावाचा बालक सत्य जगण्याचा संकल्प करून महात्मा गांधी होत असेल आणि या माध्यमात इतके सामर्थ्य असेल तर इतकी हिंसा,सेक्स आणि उथळ कार्यक्रम बघून आपली मुले काय होतील ? याची कल्पनाच करवत नाही
                     

                               टीव्ही बंद अभियान
जळगाव येथील कुतूहल फाउंडेशन चे महेश गोरडे केवळ टीव्ही व सोशल मीडिया या विषयावर जागरण करण्याचे काम गेली १० वर्षापासून करीत आहेत. या समस्येबद्दल  आतापर्यंत  महाराष्ट्रात ३ लाख माहिती पत्रकांचे वाटप केले.४०,००० हून अधिक मुलांचे सामुहिक समुपदेशन झाले आहे.शेकडो व्याख्याने, कार्यशाळा, चर्चासत्रे, विविध स्पर्धा , पालक सभा , शिक्षक सभा, अशा विविध  माध्यमातून  या विषयावर नियमित प्रबोधन करीत आहेत. टीव्ही बंद नव्हे तर टीव्ही शिस्त अभियान ते सांगतात. टीव्ही,मोबाईल,इंटरनेट, व्हाटसअप फेसबुक या माध्यमांचा योग्य प्रमाणात वापर करून उपयोग करून घ्यावा. त्यांचा अतिवापर व चुकीचा वापर टाळावा असे सांगणारे ‘या टीव्हीच काय करायचं?’ हे पुस्तक लिहिले.त्याला महाराष्ट्रभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. टीव्ही शिस्त पुरस्कार  विद्यार्थी, पालक यांना  वितरीत करतात टीव्ही,मोबाईल, इंटरनेट व सोशल मिडियाच्या  आहारी गेलेल्यांसाठी टीव्ही ,मोबाईल,इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्रही सुरू केले. केवळ टीव्ही ला विरोध न करता सकारात्मक पर्यायही दिला. मुलांचे छंदवर्ग सुरू करण्यात आले.त्यात विज्ञान प्रकल्प,बौद्धिक खेळणी,सीडी,पुस्तके,सहली,यासह उपक्रम केंद्र सुरू केले आहे. हजारो विद्यार्थी व पालक या वर्गात सहभागी झाले. यातून पालकांना पर्याय मिळाला. आठवड्यातून एक दिवस टीव्ही बंद. टीव्ही किती वेळ बघायचा याचे वेळापत्रक मुले टीव्ही शेजारी लावतात.
महेश गोरडे  फोन नंबर ९४२०७८७१७३    

                     २० सोनेरी वर्ष
महेश गोरडे सांगतात की रोज सरासरी ४ तास टीव्ही ,व्हाटस अप ,फेसबुक चा वापर याप्रमाणे एका वर्षाला १४६० तास ,तर ६० वर्षांच्या आपल्या आयुष्यात ८७६०० तास टीव्ही ,व्हाटस अप, फेसबुक साठी खर्च होतो . १२ तासांचा कामाचा दिवस धरला तर आपण आयुष्यतील २० सोनेरी वर्ष टीव्ही ,व्हाटस अप, फेसबुक वर अक्षरश: वाया घालवतो.

              भारतातील मुले (चार ते १४ वर्षे) दिवसाला सुमारे १७० मिनिटे (सुमारे तीन तास) टीव्ही बघतात. शनिवार-रविवारी आणखी जास्त म्हणजे २०० मिनिटे (सुमारे साडेतीन तास).

वय वर्षे चार ते नऊ या वयोगटातील मुलांमध्ये हेच प्रमाण अनुक्रमे १३० आणि २०० मिनिटे आहे.
संपूर्ण देशभरातील तीन कोटींहून अधिक मुले (चार ते १४ वर्षे) रात्री दहानंतरही टीव्ही बघतात.

रात्री दहानंतर एफ टीव्हीच्या प्रेक्षकांपैकी १३ टक्के, चॅनल व्हीच्या प्रेक्षकांपैकी १३ टक्के, एम टीव्हीच्या प्रेक्षकांपैकी १३ टक्के, तर बिन्दास चॅनलच्या प्रेक्षकांपैकी तब्बल १७ टक्के प्रेक्षक हे १४ वर्षांखालील मुले आहेत.

‘आहट’ या हॉरर मालिकेचे ४८ टक्के प्रेक्षक हे चार ते १४ वयोगटातील मुलं आहेत.
स्टार वनवरील ‘हॉरर नाईट्स’ या मालिकेचे हिंदी भाषिक राज्यांतील ४८ टक्के प्रेक्षक १४ वर्षांखालील मुलं आहेत, तर २५ टक्के प्रेक्षक हे नऊ वर्षांखालील मुलं आहेत.
  ( ‘व्हॉट्स ऑन इंडिया’ने मे २०१० मध्ये केलेल्या सर्वेक्षण)                                       
(महेश गोरडे 9420787173)
   -----------------------------------------                                             लेखन ///        हेरंब कुलकर्णी फोन ९२७०९४७९७१
ईमेल herambkulkarni1971@gmail.com

उस रोज़ दिवाली होती है

हि कविता अटलजींची आहे, अतिशय सुंदर .....आयुष्यभर तात्विकतेने जगलेला आणि कवितेतुन व्यक्त होणारा, मनात प्रचंड राष्ट्रप्रेम असलेला असा हा माणुस...... विरक्त पण विलक्षण इच्छाशक्ति आहे त्यांच्याकडे......आणि त्यांच्या कवितेतल्या शब्दांमधुन ति सतत दिसते.                              
दीपावली च्या मन:पुर्वक शुभेच्छा

जब मन में हो मौज बहारों की
चमकाएँ चमक सितारों की,
जब ख़ुशियों के शुभ घेरे हों
तन्हाई  में  भी  मेले  हों,
आनंद की आभा होती है
उस रोज़ 'दिवाली' होती है ।

       जब प्रेम के दीपक जलते हों
       सपने जब सच में बदलते हों,
       मन में हो मधुरता भावों की
       जब लहके फ़सलें चावों की,
       उत्साह की आभा होती है
       उस रोज़ दिवाली होती है ।

जब प्रेम से मीत बुलाते हों
दुश्मन भी गले लगाते हों,
जब कहींं किसी से वैर न हो
सब अपने हों, कोई ग़ैर न हो,
अपनत्व की आभा होती है
उस रोज़ 'दिवाली' होती है ।

       जब तन-मन-जीवन सज जाएं
       सद्-भाव  के बाजे बज जाएं,
       महकाए ख़ुशबू ख़ुशियों की
      मुस्काएं चंदनिया सुधियों की,
      तृप्ति  की  आभा होती  है
      उस रोज़ 'दिवाली' होती है ।               -

--अटलबिहारी वाजपेयी

नि:शब्द जपवणूक

यमु आजीचं  वयाच्या १६व्या वर्षी लग्न झालं. घर मध्यमवर्गी पांढरपेशी. घरात छोटी छोटे दीर नणंदा. वहिनी वहिनी करून भोवती रुंजी घालणा-या. पण घरात सास-यांची कडक शिस्त. आणि त्या काळाचे आता विचित्र वाटणारे दंडक. त्या काळी बाई माणसाने दुकानात जाऊन " shopping करायची पध्दत नव्हती. वर्षाकाठी दोन लुगडी . एक दांडीवर  आणि दुसरं .........वर. तीही दुकानदार चार पाच लुगडी घरी पाठवायचा आणि त्यातलं निवडावं लागायचं. त्याप्रमाणे लुगडी घरी आली. षोडश वर्षीय यमुनानं आपल्या भावभावनांना अनुसरून गुलाबी आणि अबोली रंग निवडले. संध्याकाळी सास-यांनी घरी आल्यावर लुगडी पाहिली आणि त्यांनी  गर्जना केली, " हे कसले रंग निवडलेत? धुवायला साबण किती लागेल कल्पना आहे का ? उद्या ही  लुगडी दुकानी पाठवून द्या आणि मळखाऊ रंगाची लुगडी मागवा. " अल्लड सुनेचा उतरलेला चेहरा सासुबाईच्या नजरेतून सुटला  नाही. माजघरातून त्यांनी सगळ ऐकलेलेच होतं . रात्री त्यांनी दोनही लुगडी पाण्यात भिजवली. कारण पूर्वी नवकोर वस्त्र भिजवल्याखेरीज नेसण्याची पध्दत नव्हती. दुस-या दिवशी सास-यांनी बाहेर पडताना सासुबाईंना लुगडी द्यायला सांगितल्यावर चेहरा शक्य तेवढा कावराबावरा करून खाल मानेनं त्या पुटपुटल्या ," अग बाई, परत का करायची होती लुगडी ? मी ती रात्रीच भिजवली. मला बापडीला काय कल्पना. चुकलंच बरीक माझं. '' आपल्या सासूचा हा समंजसपणा  सांगताना आज ८९व्या वर्षीही यमु आजींचा चेहरा तरुण यमुसारखाच कृतज्ञ होतो. हे जे शहाणपण आहे ते महत्त्वाचं नाही का? म्हणजे आजींच्या शब्दात सांगायचं झालं तर " सासुबाईनी माझंही मन जाणलं पण त्याचवेळी मामंजींनाही  दुखवलं नाही. 

आणखीही एक प्रसंग सांगताना यमु आजी खुसूखुसू हसतात. त्यांच दंतविहीन बोळकं लहान मुलासारखच निरागस वाटतं. यमु कुठेशी बाहेर गेली होती. परतायला थोडासा वेळ झाला. उंबरठ्याशी येताच मामंजींनी  फर्मान सोडलं, " आत पाऊल टाकायचं नाही. बाहेरच रहा. " पुढे बोलायची कोणाचीही प्राज्ञा नव्हती. त्यामुळे यमु वाड्याच्या अंगणात मुकाट्याने उभी राहिली. नेहमी कामात असलेली वहिनी बाहेर कशी म्हणून मुलं विचारायला लागली, " वहिनी तुम्ही बाहेर का उभ्या ?  घशाशी येणारा आवंढा गिळत  यमु म्हणाली, " अरे, तुमचा खेळ बघतेय. " बराच वेळ गेला तसा सास-यांचा राग शांत झाला. तशा सासूबाई तडक यमुकडे येऊन मोठ्याने म्हणाल्या, " काय ग करतेस अंगणात इतक्या वेळ ? पानं नाही का घ्यायची  ? " तोवर सास-यांचाही राग शांत झाला होता आणि कोणाला काहीही पत्ता न लागता यमु परत घरात नेहमीसारखी वावरायला लागली. हे जे कोणालाही न दुखावता योग्य मार्ग काढायचं शहाणपण आज आपल्यापैकी किती जणात आहे? आम्ही आपल्या हक्कांबद्दल जागरूक असतो., पण त्याचवेळी दुस-याच्या मनाचा कितीसा विचार करतो? आपण आपला मुद्दा पटवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतो. आपले आवाजही कधी कधी गगनाला भिडतात. पण ही  नि:शब्द जपवणूक खूप काही शिकवून जाते.

गुण सांगता.. दोषांचे काय?

गुण सांगता.. दोषांचे काय?

याशिवाय अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ओट्स, सीरियल्स, ऑलिव्ह तेल, किवी आदी पदार्थाचे गुण काय आहेत, याचा बराच गवगवा केला जातो. परंतु त्यांचे दोष काय, हे कधीच सांगितले जात नाही.

सफरचंदाने होणारा मलावरोध आणि मलावरोधजन्य विकृती, शरीरात वाढणारे शीतत्व व शीतत्वजन्य विकार, किवीच्या आंबटपणामुळे होणारे घशाचे विकार, ओट्समुळे मंदावणारी आतडय़ाची पुर:सरण गती, पचनाचे विकार व मलावरोध, ओट्समधील फायटिक अ‍‍ॅसिडमुळे आतडय़ांमधून कॅल्शिअम, जस्त व लोहाच्या शोषणामध्ये येणारा अडथळा, ब्रेकफास्ट सीरियल्समुळे स्थूलत्व आणि स्थूलत्वजन्य अनेक विकृतींचा धोका, शरीरात वाढणारा कोरडेपणा व रूक्षत्वजन्य विकृती, बदामामुळे होणारी कठीण मलप्रवृत्ती, ऑलिव्ह तेलामुळे होऊ शकणारे पित्तविकार- या सर्व आरोग्यसंकटांकडे भारतीयांनी काणाडोळा करावा काय?

आपल्या उत्पादनांचे ढोल पिटताना या अन्नपदार्थाचे हे आरोग्यधोके का सांगितले जात नाहीत?

हा प्रश्न केवळ आपल्या आरोग्यापुरताच मर्यादित नाही, तर त्याला आर्थिक पलूसुद्धा आहे. २०१५-१६ या वर्षांत परदेशी सफरचंदे खरेदी करण्यासाठी भारताला तब्बल १७५५ कोटी रुपये मोजावे लागले. या वर्षी ऑलिव्ह तेलाची भारताची खरेदी १३,५०० टनांवर जाईल अशी अपेक्षा आहे. ऑलिव्ह तेलाच्या लीटरमागे अगदी वीस टक्के- म्हणजे २०० रुपये फायदा आहे असे गृहीत धरले तरी १३,५०० टन तेल विकले गेल्यास दोन अब्ज सातशे कोटी रु. इतका फायदा विक्रेत्यांना होईल.

आजमितीस भारतीयांना एक कोटी १७ लाख टन खाद्यतेल लागते. त्यातला केवळ ०.१ टक्क्याहून कमी वाटा ऑलिव्ह तेलाचा आहे; जो वाढविण्यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न केले जात आहेत.

भारतीयांना ज्याची गरज नाही अशा ऑलिव्ह तेलाचा आपल्या खाद्यतेलांच्या सेवनातील हा वाटा जर दहा टक्क्यांवर गेला तर परकीय देशांना त्यातून होणाऱ्या नफ्याचा आकडा किती प्रचंड असेल याची कल्पनाच केलेली बरी.

सकाळचा नाश्ता, रोजच्या जेवणासाठी लागणारे खाद्यतेल, जेवणातील प्रमुख धान्य, भाजी, फळे, सुकामेवा असे सगळेच अन्नपदार्थ जर आपण अमेरिका व युरोपमधून आयात करणार असू, तर त्याचा आपल्या देशाचा आर्थिक ताळेबंद आणि एकंदर आíथक स्थर्यावर काय व किती विपरीत बोजा पडेल याची कल्पनासुद्धा करता येणार नाही.

परकीय खाद्यान्नातून देशाचे होणारे हे आíथक नुकसान व भारतीयांच्या आरोग्याला संभवणारे धोके समाजासमोर येणे म्हणूनच अगत्याचे आहे.
या ओट्स, ऑलिव्ह तेल, ब्रेकफास्ट सीरियल्स, किवी, ब्रोकोली वगरे पदार्थाबाबत असे काही चित्र उभे केले जाते, की यांचे सेवन केले की हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, स्थूलत्व आदी भारतीयांना ग्रासणाऱ्या जीवनशैलीजन्य आजारांवर सहज मात करता येईल. परंतु ही चक्क फसवणूक आहे. कारण या सगळ्या प्रकारात जीवनशैलीजन्य आजारांची जी खरी कारणे आहेत, त्यांकडे साफ दुर्लक्ष झालेले दिसते.

साखर, मदा, रिफाइण्ड धान्ये, मीठ, जंक फूड, तळलेला आहार यांचे नित्य सेवन, आहारसेवनाचे दोष, व्यस्त, स्पर्धात्मक, तरीही बठी जीवनशैली, परिश्रमांचा, व्यायामाचा, घामाचा अभाव, पोटावरची चरबी, स्थूल शरीर, मानसिक ताण आदी मूळ कारणांचा विचार न करता केलेले अन्य प्रयत्न निर्थक आहेत.

मूळ कारणांकडे  दुर्लक्ष करून केवळ हे अन्नपदार्थ खाऊन तुम्ही आजारांचा प्रतिबंध करू पाहत असाल तर तो प्रयत्न फोल ठरेल यात शंकाच नाही.

ऑलिव्ह, ओट्स, ब्रोकोली, किवी, सफरचंद वगरे कोणतेही परकीय फळ वा भाजीची बी आपल्या भूमीमध्ये निसर्गत: उगवत नाही. इथेच खरे तर ते पदार्थ आपल्यासाठी बनलेले नाहीत याचा संदेश निसर्गाने दिलेला आहे.

प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, अग्नी, बल, वय, कामाचे स्वरूप या सर्वाचा विचार करून आपल्याला सात्म्य होईल ते अन्न सेवन करावे. तेसुद्धा ऋतू-काळ-प्रदेश यांना अनुसरून- असे आयुर्वेदात म्हटले आहे.

परंतु परकीय पदार्थाचे सेवन करताना या मूलभूत आरोग्यनियमांना पूर्णपणे धाब्यावर बसवले जाते.
आज जग जवळ आले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या देशांतील अन्नपदार्थाचा चवीमध्ये बदल म्हणून आनंद घेण्यास काहीच हरकत नाही. मात्र, तो आपल्या नित्य सेवनाचा आहार बनला तर आरोग्याची पार वासलात लागेल, हे नक्की.

आयुर्वेदानुसार, जो आहार देशसात्म्य आहे- अर्थात निसर्गत: तुमच्या प्रदेशामधील आहे, तोच तुमच्या आरोग्याला अनुकूल आहे. आपल्या गुणसूत्रांना सर्वस्वी परक्या प्रदेशांमध्ये पिकलेले अन्नपदार्थ आपल्या आरोग्याला पूरक होण्याची शक्यता नाहीच; उलट, ते बाधक ठरेल. तसेच विविध आजारांनाही कारणीभूत ठरेल.

आफ्रिका आणि आशिया खंडांमधील मूलनिवासी जोवर आपल्या मूळ आहाराला चिकटून होते, तोवर त्यांच्यामध्ये आधुनिक जीवनशैलीजन्य आजार दिसत नव्हते, हे सांगणारे अनेक संशोधकांचे अहवाल आज उपलब्ध आहेत.

हा इतिहास असतानाही आपण जर ओट्स, ब्रेकफास्ट सीरियल्स, ऑलिव्ह तेल आदी परकीय पदार्थाच्या मागे लागणार असू, तर दुर्दैव आपल्या आरोग्याचे आणि आपल्या देशाचेही!

आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा की, याच पाश्चात्त्यांनी आपल्या बापजाद्यांना लाल तांदूळ सोडून पांढरा, रिफाइण्ड तांदूळ खायला शिकवले; जे आता पांढरा तांदूळ आरोग्याला कसा घातक आहे, हे पटवून लाल तांदळाचे गुणगान गाऊ लागले आहेत.

याच पाश्चात्त्यांनी दातांवर मिठाचे मंजन करणाऱ्या आपल्या पूर्वजांना अडाणी ठरवून टुथपेस्टने दात घासायला शिकवले. आणि आता त्याच टुथपेस्टमध्ये मीठ आहे का, म्हणून विचारताहेत.

यांनीच आपल्या मागच्या दोन पिढय़ांना वनस्पती घी खायला घालून रोगी बनवले आणि नंतर वनस्पती घी कसे घातक आहे, ते सांगू लागले.

यांनीच खोबरेल तेलामुळे कोलेस्टेरॉलचा व हार्ट अटॅकचा धोका बळावतो असे सांगितले; आणि आज तेच खोबरेल तेलाचे प्राशन कसे दीर्घायुष्य देते, हे सांगत आहेत.

यांनीच गूळ खाल्ल्यामुळे कृमी होतात, असे सांगून भारतीयांना साखरेची चटक लावली; आणि आता साखरेमुळेच अनेक रोग होतात, असे ते म्हणू लागले आहेत.

ज्या पाश्चात्त्यांची आहारासंबंधीची मते हरघडी बदलत असतात, त्यांच्या सल्ल्यावर, आहारावर विश्वास ठेवायचा कसा? तोही आयुर्वेदासारखी संपन्न आरोग्य परंपरा व समृद्ध आहार-संस्कृती ज्यांना लाभली आहे त्या देशवासीयांनी?

वैद्य अश्विन सावंत drashwin15@yahoo.com

(पोषणसंदर्भ : नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ न्युट्रिशन, हैदराबाद)